परभणी- सततचा दुष्काळ, नापिकी, यामुळे रबीचा हंगाम वाया गेलेला आहे. त्याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकविला मात्र त्यालाही बाजारात भाव मिळत नाही. पिकविलेल्या टोमॅटोलाही कमी भाव मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला. शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी खोत परभणीला आले होते. या
कार्यक्रमानंतर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या
बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी
त्यांच्या वाहनासमोर टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला़. कृषी राज्यमंत्री
सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या
कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. अचानक झालेल्या या
प्रकारामुळे काहीसा गोंधळ उडाला आणि त्याच परिस्थितीत खोत यांच्या वाहनांचा
ताफा पुढे निघून गेला़.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, केशव आरमळ आदींसह इतर कार्यकर्ते उड्डाणपुलाजवळ सुरुवातीपासूनच थांबले होते. पोलीस बंदोबस्तही तैनात होता.
















